"आमची सध्याची नवीन गाणी कशी ठेका धरायला लावतात तसं तुमच्या राग संगीतात होत नाही म्हणून मला कंटाळा येतो ” माझ्या ८ वर्षाच्या भाचीने शास्त्रीय संगीत न आवडण्याचा खुलासा केला. थोडा वेळ विचार करुन तिला म्हटलं, 'तुमच काय ते सध्याचं पॉप्युलर संगीत आहे नं, त्यातून ऱ्हिदम काढून बघ आणि मग तुला कळेल ते सुद्धा कसं अळणी वाटतं.’ याचं कारण असं की लय आणि ताल म्हणजे संगीताचे प्राण आहेत. ही लय आपल्या रक्तात भिनलेली असते. आपला श्वास, नाडी, आपली चाल, तहान, भूक, झोप सगळं काही लयीत चालू असतं. लय फक्त कमी जास्त. शतपावली करताना आणि ब्रिस्क वॉकिंग करताना श्वास, नाडी आणि चालण्याची लय कमी अधिक असते. याच प्रमाणे संगीतात काही बंदिशी संथ लयीत, काही मध्य, काही द्रुत आणि काही बंदिशी अति द्रुत लयीत गायल्या जातात. भारतीय शास्त्रीय संगीतात स्वर आणि तालाचं अतूट नातं आहे. स्वराबद्दलची ढोबळ माहिती आपण अगोदरच्या लेखामधून घेतली. या लेखामधून आपण लय आणि ताल ही संकल्पना जाणून घेऊ.
लय हा ताल शास्त्राचा मुळ घटक आहे. लय याचा व्यवहारीक अर्थ 'गती’. ताल शास्त्राच्या दृष्टिने लय म्हणजे दोन मात्रांमधले सारखे अंतर. भारतीय शास्त्रीय संगीतात लयीचे तीन प्रकार मानले जातात. 'मध्य लय’ म्हणजे मध्यम गती. या लयीत म्हटलेल्या बंदिशीला 'छोटा ख्याल’ असे म्हणतात. यापेक्षा कमी लय असल्यास त्याला 'विलंबित लय’ म्हणतात म्हणजेच संथ किंवा धीमी लय. या मधे तालाच्या दोन मात्रांमधील अंतर अधिक असते. ख्याल गायन या लयीत केले जाते. या लयीत गायलेल्या बंदिशीला 'बडा ख्याल’ असे म्हणतात. मध्य लयीपेक्षा जास्त लय असल्यास त्याला 'द्रुत लय’ असे म्हणतात. त्याची गति जलद असते. या मधे तालाच्या दोन मात्रांमधले अंतर अत्यंत कमी असते. सर्वसामान्यपणे ख्याल गायनातली शेवटची बंदिश द्रुत गतीत असते.
मैफिलीची सुरवात सामान्यत: विलंबित लयीने होते. गायक बंदिश गाऊन झाल्यावर आपल्या प्रतिभेने रागातले स्वर आळवतात. कलाकार हळू हळू ही लय वाढवत नेतात आणि बडा ख्याल संपतो. त्यानंतर छोटा ख्याल गायला जातो.
सेकंद, मिनीट, तास ई. काल मोजण्याची मापने आहेत. संगीतातला काल मोजण्यासाठी 'ताल’ ही संकल्पना वापरली जाते. जगातील कुठल्याही ताल पद्धतीच्या तुलनेत भारतीय ताल पद्धती ही अधिक समृद्ध आहे. मात्रा म्हणजे ठोका (stroke). मात्रांच्या समूहाला 'ताल’ असे म्हणतात. संख्येप्रमाणे वेगवेगळ्या मात्रांचे अनेक ताल भारतीय संगीतात प्रचलित आहेत. ख्याल गायनासाठी तीनताल, झूमरा, तिलवाडा, एकताल इ. ताल वापरले जातात तर ठुमरी, कजरी सारख्या उपशास्त्रीय प्रकारात दीपचंदी, दादरा किंवा तत्सम ताल वापरले जातात. सुगम आणि भक्ति संगीतात केहरवा, भजनी, धुमाळी सारखे ताल वापरले जातात. कुठल्या गीत प्रकाराला कुठलं ताल वाद्य साजेसं आहे याचा ही अभ्यास बुजुर्गांनी करुन ठेवलेला आहे. ध्रुपद धमार, भजन, अभंग या सारख्या गीत प्रकारात मृदंग, पखवाज वापरला जातो, तर ख्याल गायनासाठी तबला प्रचलीत आहे. त्याच प्रमाणे लावणी सारखे गीत प्रकार ढोलकीच्या सहाय्याने गायले जातात. या व्यतिरिक्त घटम, ढोल, जेंबे, डफ, दिमडी इत्यादि सारखी वाद्य ताल सौंदर्य वाढवण्यासाठी वापरली जातात. तुर्तास आपण राग संगीतासाठी वापरल्या जाणाऱ्या तालांचा विचार करु.
राग प्रस्तुतीकरणाची सुरवात स्वर विस्ताराने होते. राग स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर 'बंदिश’ सुरू होते. इथे ठेक्याचा प्रारंभ होतो. ठेका म्हणजे तालाचे प्राथमिक बोल. बंदिशीच्या ज्या अक्षरावर ठेक्याचा पहिला बोल तबल्यावर वाजतो. उदा. सहेला रे’ या बंदिशीत 'रे’ या अक्षरावर तबल्याचा पहिला बोल वाजतो, ती तालाची पहिली मात्रा असते. सांगितीक भाषेत त्याला 'सम’ असे म्हणतात. 'अलबेला सजन आयो रे’ या बंदिशीत 'आ’ या अक्षरावर सम आहे तर 'केतकी गुलाब जूही चंपक बन फुले’ मधे 'चं’ या अक्षरावर सम आहे. बंदिश म्हणताना प्रत्येक वेळी त्या अक्षरांवर ठेक्याची पहिली मात्रा वाजते आणि पुढे प्रत्येक ओळीत वेगवेगळ्या अक्षरावर अशी सम येत रहाते. भारतीय शास्त्रीय संगीतात 'सम’ ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. ही सम म्हणजे रसिकांचे हमखास मान डोलवायचे ठिकाण !!
पहिल्या मात्रे नंतर ठेक्याचे उर्वरित बोल तबल्यावर वाजतात. तालानुसार मात्रांची संख्या वेगवेगळी असते. ४, ६, १०, १२, १४, १६ वगैरे. मात्रेच्या संख्येनुसार तालाला वेगळी नावे असतात. ४ मात्रांचा केहरवा, ६ मात्रांचा दादरा, १० मात्रांचा झपताल, १२ मात्रांचा एकताल, १४ मात्रांचा आडा चौताल, १६ मात्रांचा तीनताल वगैरे. विषम मात्रांचे म्हणजे ७, ९, ९.५, १०.५, १५ वगैरे मात्रांचे देखील ताल असतात. यामधे गाण्याचा विशेष सराव असावा लागतो म्हणूनच या तालात गायचं प्रमाण तुलनेने कमी असते.
प्रत्येक बंदिश एखाद्या तालात निबद्ध असते. उदा. भूप रागातील 'सहेला रे’ ही १६ मात्रेत म्हणजेच तीनतालात गायली जाते तर कलावती रागातली 'तन मन धन तोपे वारूँ’ ही बंदिश १२ मात्रेत म्हणजेच एकतालात गायली जाते. तालाच्या प्रत्येक मात्रेवर तबल्याची अक्षरे म्हणजे बोल वाजत असतात. तबलजी आपल्या प्रतिभेप्रमाणे प्रस्तुतीकरणात बदल करत मैफिलीत रंग भरत असतो, अर्थात मुळ ठेक्याच्या आधारावरच.
१२ मात्रा वाजवून झाल्या की एक सर्कल म्हणजेच एक फेरी पूर्ण होते आणि पुनः पहिली मात्रा वाजते. तालाच्या एका फेरीला 'आवर्तन’ असे म्हणतात. गायन चालू असताना अशी अनेक आवर्तनं होतात. सामान्यपणे बंदिशीची एक ओळ एका आवर्तनात बांधलेली असते.
उदा.
ताल : एकताल , मात्रांची संख्या : १२
मात्रा १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२
ठेका धीं धीं धागे त्रक तु ना कत्त ता धागे त्रक धी ना
बंदिश त न . म न ध न तो पे वा रुँ .
तन मन धन तोपे वारूँ - १२ मात्रा - एक आवर्तन
बार बार तोरी साँवली - १२ मात्रा - एक आवर्तन
सूरत और नैननवा - १२ मात्रा - एक आवर्तन
रसीले - १२ मात्रा - एक आवर्तन
वरच्या ओळीत त,बा,सू,र या अक्षरांवर ‘सम’ आहे.
अशा रीतीने वेगवेगळ्या तालात, वेगवेगळ्या लयीत, वेगवेगळ्या बंदिशी म्हणत, कधी स्वरातून, कधी आकारातून तर कधी बंदिशीतल्या शब्दातून राग स्वरूप उलगडून दाखवलं जातं. कलाकाराचे ते स्वर, शब्द आणि लय एकत्रितपणे श्रोत्यांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती देत असतात.